पंच रथ मंदिर - महाबलीपुरम्
चेन्नईपासून दक्षिणेस सुमारे ६० किलोमीटर्स अंतरावरती समुद्याकीनार्यावर असलेले महाबलीपुरम् हे गाव तसे लहानच , पण अप्रतिम मंदिर शिल्प , लेणी शिल्प आणि मूर्तीकला यासाठी वर्षभर इथे पर्यटकांची गर्दी असते . याच ठिकाणाला इकडे मामाल्लीपुरम् असे पण म्हणतात .

महाबलीपुरम् हे नाव कसे पडले याला दोन आख्यायिका आहेत . पौराणिक कथेप्रमाणे भगवान विष्णूंनी वराह अवतार धारण करून ज्या दैत्याला संपवले त्या दैत्याचे नाव महाबली , तो इथला म्हणून गावाचे नाव महाबलीपुरम् . ऐतिहासिक संदर्भांनुसार इसवीसनाच्या सातव्या शतकातील पल्लवराजा नरसिंह वर्मन हा महा-मल्ल म्हणजेच प्रचंड बलशाली होता , त्यावरून गावाचे नाव महामल्लपुरम् आणि अपभ्रंश होत होत आज मामाल्लीपुरम् अथवा महाबलीपुरम् झालं.
असे हे महाबलीपुरम् आज जरी विस्ताराने लहान असले तरी सातव्या शतकाच्या आसपास म्हणजेच पल्लव राजांच्या राजवटीत ते एक महत्वाचे बंदर म्हणून विकसित झाले होते , उत्खनन करताना सापडलेली शेकडो ग्रीक नाणी इथून थेट ग्रीस पर्यंत चालणार्या व्यापाराचे पुरावे देतात .
पांडवांनी आपल्या अज्ञातवासाच्या काळात काही काळ याठिकाणी घालवला होता असं म्हणतात . कदाचित याच कारणामुळे पल्लव राजा महेंद्रवर्मन आणि त्याचा मुलगा नरसिहवर्मन पहिला यांनी पाच पांडवांसाठी म्हणून पाच रथ समुद्राजवळच्या एका महाकाय समुद्री खडकावर कोरण्यासाठी घेतले . वैशिष्ट म्हणजे हे पाचही रथ ( मंदिर) एकाच सलग आणि अजस्त्र दगडामध्ये खोदून बनवले आहेत .
डावीकडे नकुल - सहदेव यांचा रथ , त्याशेजारील महाकाय हत्ती , मध्ये दिसतो आहे तो महाबली भीमाचा रथ , आणि उजवीकडे समोर धर्मराज युधिष्ठिराचा रथक
भारतीय पुरातत्त्व विभागाच्या माहितीनुसार असे कळते की पल्लव राजांकडे असलेल्या लाकडी रथांच्या प्रमाणे हुबेहूब दिसणारे रथ त्यांना दगडात कोरायचे होते . पाचही रथांचे कोरीव काम अतिशय सुबक आणि कल्पकतेने केले आहे .
धर्मराज , भीम , अर्जुन यांच्यासाठी प्रत्येकी एक रथ , नकुल आणि सहदेव या दोघांसाठी एक आणि पांचालीसाठी एक स्वतंत्र रथ ज्यात तिची प्रतिमासुद्धा कोरलेली आहे असे एकूण पाच रथ आपल्याला दिसतात .
युधिष्ठिराचा रथ
अर्जुनाच्या रथाच्या मागील बाजूस त्याच्या biological father ची म्हणजेच इंद्राची प्रतीमासुधा बघायला मिळते. यातील अर्जुन व धर्मराज युधिष्ठीर यांचे रथ हे बौद्ध विहार शैली मध्ये कोरलेले आहेत . त्यांचे कळस विशेष सुंदर वाटतात .
अर्जुनाचा रथ
महाबली भीमाचा रथ
नकुल- सहदेव यांचा रथ हा बौद्ध चैत्य आकाराचा वाटतो . याशिवाय दगडावर कोरलेला जबडा उघडून डरकाळी फोडणारा एक सिह आणि एक महाकाय हत्ती सुद्धा या पाच मंदिरांच्या सोबतच आपण बघू शकतो.
धाकटा भाऊ आणि सिह
नकुल - सहदेव यांचा रथ
पांचालीचा रथ
पांचाली रथामधील पांचालीची प्रतिमा
पुढे नरसिहवर्मन याच्या मृत्यूनंतर काही कारणांमुळे या रथांचे काम अर्धवट अवस्थेतच राहिले , आणि मग राहूनच गेले . त्यामुळे सध्या आपल्याला दिसणारी कलाकृती ही तिच्या आराखड्याप्रमाणे पूर्ण झालेली नाही, मंदिरांच्या खालचा भाग , आजूबाजूचा भाग अजूनही थोडासा अपूर्ण वाटतो .पण तरीही बघणार्याला या गोष्टीचा विशेष फरक पडत नाही. अर्धवट झालेल्या कामामुळेच या मंदिरांमध्ये कुठल्याही मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झालेली नाही आणि म्हणूनच तिथे कुठलेही धार्मिक विधी अथवा पूजा वगैरे होत नाहीत .
बहुसंख्य इतिहासकार आणि विद्वान यांच्यामते महाभारताचा काळ हा इसवीसनापूर्वी सुमारे पाच ते साडेसात वर्ष जुना . इतक्या जुन्या काळातीलएका महानाट्यातील नायक- नायिकेसाठी इसवी सनाच्या सातव्या शतकात कुणा राजाने अश्या अजस्त्र दगडांत इतके सुंदर रथ बांधावेत याची कमाल वाटते तसेच भारतीयांच्या मनावर आणि भारतीय संस्कृतीवर शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या महाभारताच्या वलयाचेपण नवल वाटते .
बहुसंख्य इतिहासकार आणि विद्वान यांच्यामते महाभारताचा काळ हा इसवीसनापूर्वी सुमारे पाच ते साडेसात वर्ष जुना . इतक्या जुन्या काळातीलएका महानाट्यातील नायक- नायिकेसाठी इसवी सनाच्या सातव्या शतकात कुणा राजाने अश्या अजस्त्र दगडांत इतके सुंदर रथ बांधावेत याची कमाल वाटते तसेच भारतीयांच्या मनावर आणि भारतीय संस्कृतीवर शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या महाभारताच्या वलयाचेपण नवल वाटते .
चेन्नई ला कधी जाणे झालेच तर या पंच रथांना मुद्दामून भेट द्यावी हे मुद्दामून सांगायला नको . इथल्या इतर लेणीशिल्प आणि मंदिरांबद्दल परत कधीतरी .
--- ©Advait Khatavkar