Tuesday, 26 December 2017

200 मीटर ते 200 किलोमीटर - माझे कॉलेज पर्यंतचे सायकलींग चे किस्से

200 मीटर ते 200 किलोमीटर - माझे कॉलेज पर्यंतचे सायकलींग चे किस्से


काही गोष्टी तुमच्या आयुष्यात तुमच्या ध्यानीमनी नसताना नकळत येतात  , पुढे त्या गोष्टी हळूहळू आवडू लागतात -त्याची गोडी वाढू लागते . त्या गोष्टींबद्दल विस्मयकारक / अद्भुत घटना घडतात  त्या गोष्टीचा छंद जडतो  व कालांतराने तुमच्या आयुष्याचा भाग बनून जातात .सायकल आणि सायकलिंग बाबत माझ्या आयुष्यात काहीसं असंच झालंय.

माझ्या आयुष्यात सायकल नेमकी कधी आली ते मला स्वतःला आठवत सुद्धा नाही . काहीही न कळण्याच्या वयात माझ्यासाठी आई बाबांनी  तीन चाकी सायकल आणलेली .  २७-२८  वर्षांपूर्वीचे जुने फोटो बघितल्यावर काही फोटोंमध्ये मी तीनचाकी सायकलवर बसलेलो दिसतोय .आम्ही पुण्याजवळ देलवडीला होतो  त्यावेळी त्या सायकलसकट एकदा जिन्यावरून खाली गडगडत आल्याचे पुसटसं आठवतं .

                       देलवडीला असतानाचा माझ्या पहिल्या सायकल बरोबरचा फोटो . वय वर्ष ३-४ .

वयाच्या साधारण तिसऱ्या वर्षी म्हणजे चड्डी घालायची अक्कल नव्हती त्याकाळी एक लाल रंगाची सायकल माझ्याकडे होती. ती सायकल पुढे काही वर्ष मी चालवत असलो पाहिजे कारण सावंतवाडीला बालवाडीत असताना एका सायकल स्पर्धेत पोडियम मारल्याचे मला चांगलेच आठवतेय . त्या रेसचा फोटो बघून तर काही आठवणी ताज्या होतात . स्पर्धेच्या आधी कमरेच्या खाली एक गळू  ( Boil ) झालेलं होतं बहुदा आईने त्याला ड्रेसिंग करून दिलेलं .बसायला काय चड्डी घालायलासुद्धा त्रास होतं होता .आणि अश्यातच तीन चाकी सायकलच्या स्पर्धेत उतरलेलो. माझी सायकल डबलसीट वाली होती , नीटसं आठवत नाही पण बहुदा वजन नको म्हणून मागची सीट काढून ठेवली असणार किंवा मी तोडून टाकली असणार . स्पर्धेच्या दिवशी सकाळी सावंतवाडीच्या मुख्य बाजारात श्रीकृष्ण कोल्ड्रिंक हाऊस ते काणेकरांच्या लाकडी खेळण्याच्या दुकानाच्या मधल्या भागात स्पर्धकांसाठी चुन्याने लेन बनवल्या होत्या ( लहानपणी बालवाडी -पहिली -दुसरी अशी तीनच वर्ष सावंतवाडीत होतो पण जवळजवळ सगळे रस्ते व ठराविक ठिकाणं अजूनही  डोक्यात फिट्ट बसलेले आहेत त्यामुळे आजही त्या घटना रस्ते व जागांसकट आठवतात ) प्रत्येक स्पर्धकाने आपापल्या लेन मधून सायकल चालवायची होती . मला रस्त्याच्या सर्वात उजवीकडची अगदी नालीच्या शेजारजी लेन दिलेली होती ..शेजारीच नाली असल्याने आपण सायकल पळवण्याच्या नादात त्यात पडू की काय अशी भीती त्यावेळी वाटल्याचे मला अजूनही चांगलंच आठवतंय . नशिबाने माझ्या शेजारचा स्पर्धक नव्हता आला , त्यामुळे मला शेवटून दुसऱ्या लेन मध्ये ठेवण्यात आले . नक्की अंतर माहिती नाही पण अंदाजे २०० मीटरची ती छोट्या मुलांसाठीची सायकल स्पर्धा होती .
आयुष्यातल्या पहिल्यावहिल्या सायकल स्पर्धेत मी (चट्ट्यापट्ट्याचा टीशर्ट) आणि  माझा सगळ्यात जुना मित्र हर्षल  (लाल शर्ट) आपापल्या सायकली हाणताना  

स्पर्धा सुरु झाल्यानंतर तिसऱ्या का चौथ्या मिनिटाला मी अंतिम रेषेच्या पलीकडे होतो . माझा मित्र हर्षल कुलकर्णी त्याची आकाशी रंगाची सायकल हाणत माझ्यापेक्षा काही सेकंद आधी पोचला होता .व माझा दुसरा नंबर आलेला . ती माझ्या आयुष्यातली पहिलीवहिली सायकल रेस . गळू ठणकत असताना पूर्ण केलेली . नंतर चड्डी खाली घसरत असताना पोलीस काकांकडून घेतलेले दुसऱ्या नंबरचे बक्षीस सुद्धा चांगले आठवतेय . (नशीब फोटो काही सेकंद आधी घेतला गेलाय 😁 ) .
                           पोलीस काकांकडून दुसऱ्या नंबरचे बक्षीस घेताना पोडियम फिनिशर मी 😁

          मी दुसरीत असताना आम्ही सावंतवाडी सोडली  त्यानंतर ती सायकल कुठे गेली ते आता आठवत नाही . पुसदला आल्यावर गजानन मंदिराच्या समोर राहायला असताना शेजारचे व शाळेतले असे खूप जण मित्र मैत्रिणी म्हणून  मिळाले . त्यापैकी काही जण आमच्यापेक्षा वयानी ३-४ वर्षांनी मोठे सुद्धा होते . त्यातले काही जण भाड्याच्या सायकली तासाने चालवायला आणायचे . सायकलवाल्याकडे काही माध्यम आकाराच्या व काही लहान सायकली होत्या . त्यांना बघितल्यावर आपणही सायकल चालवावी असे वाटायचे पण दोनचाकी सायकल येत नव्हती .दोन- चार वेळा आईकडून ५० पैसे घेऊन छोटी सायकल शिकायला म्हणून आणली . शेजारची रिता ताई आणि एक दोन मोठे मित्र मागे धरून चालवायला शिकवायचे . कधी कधी त्यांच्या मोठ्या सायकलवरपण त्यांच्या मदतीने शिकण्याचा प्रयत्न करून झाला पण सायकल काही स्वतःची स्वतः सुटी चालवता येत नव्हती . हे सगळं करताना बरेचदा कोपरं गुढघे फोडून पण घेतलेले .

                   एकदा मात्र एक विलक्षण घटना घडली ... रात्री झोपेत एक स्वप्न पडलं .. स्वप्नात मी सायकल चालवायला शिकत होतो , रिता ताईने अचानक माझी सायकल सोडून दिलेली आणि मी त्याची पर्वा न करता न धडपडता स्वतः ची स्वतः व्यवस्थित सायकल चालवत होतो ... मी सायकल चालवायला शिकलो होतो . जाग आली तेव्हा दरदरून घाम फुटला होता , आपण ग्राउंडवर सायकल चालवतोय का घरात झोपलो आहे ते कळेना . आजूबाजूला बघितल्यावर ते स्वप्न होतं याची खात्री पटली पण मनात चलबिचल होताच होती .  ते फक्त एक स्वप्न होतं का कसली अनुभूती होती हे कळायचं वय नव्हतं पण काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं होत असल्याची जाणीव होत होती . दुसऱ्या दिवशी बहुदा सुट्टीचा दिवस होता . सकाळी सकाळी आईकडून पैसे घेऊन एकट्याने सायकलवल्याचे दुकान गाठले व एक छोटी सायकल घेतली . रात्रीच्या स्वप्नाने एक जबरदस्त आत्मविश्वास दिलेला. ते स्वप्न होतं हे पूर्णपणे माहिती असूनसुद्धा आपण काहीतरी केलं तर तोंडावर आपटू अशी अजिबात भीती वाटली नाही . एकट्यानेच सायकलवर टांग मारली व चालवायला सुरुवात केली ...सायकल पुढे जायला लागली व हळूहळू तोल सांभाळत मी ती काळजीपूर्वक रस्त्यावर चालवायला लागलो . काय गम्मत झालेली काय माहिती पण अश्याप्रकारे अक्षरशः एका रात्रीतून मी अचानक सायकल चालवायला शिकलो होतो . म्हटलं तर चमत्कार , म्हटलं तर मानसशास्त्र किंवा आणखी काही . कदाचित आधीचे काही दिवस सायकल शिकण्यासाठी केलेले प्रयत्न व इतर मोठ्या मित्र-मत्रिणींनी केलेली मदत ही तोफेत भरलेला दारुगोळा होता व त्या स्वप्नानी त्याला बत्ती देण्याचे काम केले असावे . त्या दिवशी घरून आणखी पैसे घेऊन पुढचे काही तास मी पुसदच्या शंकर नगर व मोती नगरच्या रस्त्यांवर सायकल फिरवत होतो . एखाद्या पक्षाच्या पिल्लाने पडत पडत अचानक उडणे  शिकल्यानंतर उंच भरारी घेतल्यानंतर त्याला जसं वाटत असेल अगदी तीच अवस्था माझी झालेली होती. घरच्यांना आणि मित्र मैत्रीणींना पण असं अचानक काय झालं याचं आश्चर्य वाटत असणार .

                  यानंतर अनेकदा भाड्याची सायकल घेऊन जवळपास फिरणं व्हायचं . पाचवीला गेल्यावर आई-बाबांनी ऍटलासची सायकल घेऊन दिलेली. रोज शाळेत त्यावरच जाणे होई . एकदा त्या सायकलवर केलेला स्टंट व्यवस्थित आठवतो  ...  पाचवीला होतो .नुकतीच सायकल घेतली होती . एका रविवारी एकटाच सायकलवर बोंबलत  फिरत असताना आसेगावकर शाळेशेजारचं उंच टेकाड दिसलं . आधी बरेचदा त्या टेकाडावर खेळायला म्हणून आम्ही जात असू  . त्यावर सायकल चढवून नेली तर खाली जोरात येताना काय मज्जा येईल ---असं म्हणून त्यावर सायकल हातात घेऊन चढवली बऱ्यापैकी तीव्र चढ असल्यामुळे धापा टाकत कसंबसं वर पोचलो. त्या टेकाडावर जायला खरंतर रास्ता अथवा पायवाट अशी नव्हतीच , सगळा मामला ओबडधोबडच होता . खाली येण्यापूर्वी त्यातल्यात्यात बरा पट्टा बघितला .तिथे काही बकऱ्या चरत होत्या . वरून सायकल येत असताना त्या बाजूला होतील असा विचार करून मी सायकलवर बसलो व सायकलसकट स्वतःला उतारावर सोडून दिलं . भयंकर वेगाने येणारी सायकल आणि त्यावर बसून ओरडत खाली येणाऱ्या मला बघूनसुद्धा ती बकरी काही ढिम्म हालली नाही .त्या वेगात सायकल नियंत्रणात आणणं अथवा दिशा बदलणं अशक्य होतं . मी त्याच वेगात सरळ त्या बकरीला जाऊन ठोकलो .. सायकल सकट मी हवेत गिरकी घेतलेली मला आठवतेय ..... आणि त्यानंतर दाणकन आपटल्याचा आवाज उडालेली धूळ आणि ओरडणारी बकरी एव्हढाच आठवतंय .काय झालंय हे कळायला व आपण जिवंत आहोत हे समजायला काही सेकंद लागले . दुपारची वेळ असल्यानं जवळपास कुणीही नव्हतं . आपल्याला नेमकं कुठेकुठे लागलंय  - सायकलचं काय काय तुटलंय - ती बकरी जिवंत आहे का ? हे सगळं याचं क्रमाने तपासलं . मुरमाड जमिनीवर वेगाने घासल्या गेल्यामुळे मला बऱ्यापैकी लागलेलं होतं ...सायकल साधी असल्याने सायकलचे काही नट निघालेले . बकरीसुद्धा जिवंत होती व पलीकडे जाऊन चरत होती .मळालेल्या कपड्यांनी , खरचटलेल्या अंगानी व तुटलेली सायकल हातात घेऊन तडक घरी गेलेलो . हा माझ्या आयुष्यातल्या पहिलाच  डाऊनहीलिंग सायकलींगचा अनुभव - आयुष्यभर लक्षात राहणारा .  त्यानंतर बरेचदा MTB  वर डाऊनहीलिंग केलं पण इतकं बेक्कार कधीही  आपटलो नाही .

           नववीला असताना हिरोची डेव्हिल मिळाली . ती चंदेरी रंगाची दणकट असलेली MTB सायकल मला जाम आवडायची . त्यावर पुसद व पुसदच्या आजूबाजूला खूप फिरल्याचे आठवतंय . आमचे पुसदचे घर जरा गावाच्या एका टोकाला होतं . तिथून बाहेरगावी जाण्यासाठी ३ वेगवेगळे रस्ते होते . कधी कार्ला रस्त्याने छोटासा घाट चालून वर तर कधी सांडवा -मांडवा रस्त्याने डोंगराळ भागात दूर इसापूर धरणापर्यंत पर्यंत एकट्यानेच जाणं होतं असे . दहावीला असताना पुसदला एक 25 किलोमीटरची छोटीशी सायकल रेस झालेली त्यात खुल्या गटात भाग घेऊन रेसिंगचा थरार अनुभवलेला . अकरावी बारावीला असताना ३५-४० किलोमीटर केल्यानंतर सायकलिंगची वेगळीच मजा अनुभवायला शिकलो .या दरम्यान दिग्रसला जाताना लागणार घाट , खंडाळा घाट  , पूस धरण अश्या अनेक राइड्स कधी मित्रांबरोबर तर कधी एकट्याने झाल्या .एकदा मातोश्रींबरोबर इसापूर धरणावर सायकलवर गेलेलो .मातोश्रींनी त्या वयात डोंगराळ भाग बिना गियरच्या लोखंडी सायकलवर कडक उन्हात चढून कमाल केलेली .

           एकदा काही मित्रांना घेऊन जंगल सफारीसाठी सायकलवर खंडाळ्याच्या जंगलात बरेच पुढे गेलेलो ( हा विदर्भातला पुसद जवळचा खंडाळ्याचा घाट बरं का )  .जाताना रस्तावर नीलगाय दिसलेली तर जंगलात थोडं आतमध्ये रानडुकरांची टोळी दिसलेली . पार वाशीम जिल्याची सीमा ओलांडूनच परत आलेलो आम्ही त्यावेळी .

                    अशीच एक खंडाळ्याची रपेट चांगलीच लक्षात राहण्याजोगी - अकरावीला असताना लेक्चर बुडवून अमित आणि सुमित या अतरंगी -अवकाळी  मित्रांबरोबर सायकलवर खंडाळ्याचा घाट गाठला . सायकली रस्त्यावर लावून आम्ही बरेच आतमध्ये जंगलात फिरायला म्हणून गेलो . मागच्या बाजूला खाली दिसणारं एक सुंदर तळे बघून परत येत होतो . पानगळीचा ऋतू असल्याने व संपूर्ण जंगल सागवानाची असल्याने जंगलातल्या झाडांची सुमारे ८० टक्के पाने वळून खाली पडलेली होती . ती पाने  तुडवत चालताना कचर कचर आवाज होत होता .. काहीठिकाणी तर पाय गुडघ्यापर्यंत आत पानांमध्ये जात होता . अश्यात अम्याला काय दुर्बुद्धी सुचली काय माहित - लेकाने सोबत आणलेली काड्यापेटी काढली व एक वाळलेलं पान दिलं पेटवून ...ठणठणीत वाळलेलं कोरडं जंगल ते ...आम्ही तिथून निसटायच्या आत आमच्या समोरच धडाधडा आग पेटली . सागवानाची असंख्य वाळलेली पाने डोळ्यादेखत धडाधडा पेटलेली बघून आम्ही रस्त्याकडे पळत सुटलो . रस्त्यापर्यंत येईतोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते व रस्त्यालगतच्या वाळलेल्या पानांपर्यंत ती आग येऊन पोहोचली होती . आम्ही पटापट सायकली काढल्या व टांग टाकून पुसदच्या दिशेने सुसाट सुटलो . आपण भयंकर मोठा आगावपणा केला आहे याची सगळ्यांना खात्री पटलेली . आग जरावेळात शांत होईल याची खात्री होती - तरीही कुणासमोर या गोष्टीची वाच्यता करायची नाही असे ठरवलेले . जरा पुढे येताच घाटात आमच्याच दिशेने वर येणारी पोलिसांची जीप दिसल्यावर मात्र फाटायचीच बाकी राहिलेली . तरीपण थोडं डोकं वापरून विचार केला की पोलिसांचा हा  नेहमीच राउंड असणार ते वर येईपर्यंत आपण त्यांना पार करून खाली पोचलेले असू . फक्त कुणी त्यांना पास होताना जंगल - आग - पेटवलं वगैरे शब्द उच्चरायचे नाहीत असं ठरवून आम्ही काही घडलंच नाही अश्या आवेशात गपचूप पुसदला येऊन पोचलो . पुढे बरीच वर्ष तो किस्सा आठवून दात काढत होतो . पण परत असलं काही धतींग करून जंगलांना व जंगलात राहणाऱ्या जीवांना हानी पोचवायची नाही असा निश्चय केला .            
                सध्या The Kayakers या ग्रुपनी  पुणेकरांसाठी  Pedal to Kayak  हा जबरदस्त उपक्रम आयोजित केलेला आहे . पुण्यातून सायकलवर गेलात तर मोफत कयाकिंग करायला शिकवतात . आम्ही २००४ साली Pedal to Kayak  अचानक कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय केलेलं . एकदा कॉलेजला असताना कौतुकला घेऊन पुसदपासून सुमारे २८ km  वर असणारं पूस धरण सायकलवर गाठलं . पावसाळ्याचे दिवस सुरु होते व धारण तुडुंब भरलेलं होतं . धरणाच्या पाण्यात थर्माकोल टाकून एक स्थानिक मासेमार झिंगे पकडत होता . नेमका आम्ही तिथे काठावर गेलो असतानाच तो जेवायला म्हणून बाहेर आलेला . तो जेवेपर्यंत त्याचं ते थर्माकोल घेऊन आम्ही आळीपाळीने पाण्यात उतरलो . दोन्ही बाजूने पाय पाण्यात टाकून स्वतःच तोल सावरत हातातल्या दांडक्याने ते वाळवत खोल पाण्यात बऱ्याच आतमध्ये जाऊन आलो . जाताना जराजरा गडबड झाली तरी आपण पाण्यात पडू शकतो हे माहिती होतं . सुदैवानी वारा नसल्यामुळे आम्हीओ दोघेही एत्या जुगाडू कयाक वर  बसून कयाकिंग करून आलो . परत आल्यानंतर यथावकाश  फोटो आले . फोटो बघितल्यावर भलते साहस केल्याबद्दल मातोश्रींकडून  भरपूर बोलणी पण  खाल्लेली .

 आयुष्यातला पहिला वाहिला Pedal to Kayak चा अनुभव . 

मी आणि कौतुक तुडुंब भरलेल्या पूस धरणाजवळ . साल २००४ 

      सायकल ही गोष्ट पाचवीपासून जी अत्यावश्यक झाली ती त्यानंतर नेहमीसाठीच . अकरावीत असताना आईनी पुण्यातून हिरोची Hawk सायकल घेऊन दिली . स्टील बॉडी असलेली बिनागिअरची ती सायकल माझी पहिली रोड बाईक .

                अकरावी बारावी ते पुढे MCA  होईपर्यंत ती सायकल रगडून वापरली . पुसदला असताना सांडवा मांडवा च्या रस्त्यानी कधी उमरखेड रस्त्याने टेकड्या चढत सायकलने जास्तीत जास्त लांब जाण्यात मजा वाटायला लागलेली होती . पुढे २००६ साली पुणे - बारामती  या अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित सायकल स्पर्धेत " Indian Cycle  Without  Gears  " या गटात भाग घेऊन सायकल रेसिंगचा थरार अनुभवला होता . १३८ km  चे अंतर वेगात पार करून बारामतीला पोचेपर्यंत अक्षरशः वाट लागलेली. त्यात अनेक राष्ट्रीय सायकलपटूंना बघून व त्यांच्या लै भारी सायकली बघून खूप इंप्रेस झालो होतो . कमवायला लागल्यानंतर स्वकमाईतून चांगली रेसिंग सायकल घ्यायची हे तेव्हाच ठरवले होते . रेस पूर्ण करून लगेच दुसऱ्याच दिवशी पुसदसाठी बस पकडलेली . सायकल बसच्या डिकीत ठेवली होती . प्रचंड थकलो असल्याने सकाळी पुसद कधी येऊन गेलं ते कळलंच नाही . डोळा उघडेपर्यंत सुमारे ७५ km पुढे दारव्हा जवळच्या बोरी-अरब पर्यंत जाऊन पोचलो होतो . मग परत हॅन्डबॅग पाठीवर अडकवून सायकलवर केलेला बोरी -एरव्ही ते दारव्हा असा १० km चा  प्रवास - त्यानंतर सिमेंट नेणाऱ्या ट्रकमधून दिग्रस पर्यंत मिळालेली लिफ्ट व परत दिग्रस ते पुसद असा ३० किलोमीटर सायकलवरची रपेट ही पुणे -बारामती रेस इतकीच थरारक होती . दिग्रस वरून पुसदला येताना एका मित्राला-  चिक्याला मी सायकलवर हॅन्डबॅग पाठीवर अडकवून येताना दिसलो तेव्हा त्याचे उघडे पडलेले तोंड व बाहेर आलेले डोळे अजूनही लक्षात आहेत . 

     शिकायला MCA  साठी पुण्यात आल्यानंतर सायकलिंग ला भरपूर वाव मिळाला . रोज कॉलेज -क्लास वगैरे साठी सायकल वापल्यामुळे भरपूर सायकलिंग होई व वेगवेगळे रस्ते सुद्धा माहिती होत असत . पुढे जॉब ला लागल्यावर २०१२  साली life cycle कडून घेतलेली Bergamont ची MTB ही माझी स्वकमाईतून घेतलेली पहिली सायकल . त्यावर लांब लांब भटकून झाल्यानंतर व पहिली 200 km ची BRM केल्यानंतर २०१६ ला Cannondale  ची रोड बाईक घेतली . त्यावर आता BRM राइड्स व रेसेस जोरात सुरु आहेत . 

 २०१२  साली life cycle कडून घेतलेली Bergamont ची MTB ,माझी स्वकमाईतून घेतलेली पहिली सायकल .

        २०१६ ला घेतलेली  Cannondale ची रोड बाईक

Monday, 11 December 2017

वाढलेले साहसी पर्यटन आणि डोंगरदऱ्यांचे पावित्र्य

वाढलेले साहसी पर्यटन आणि डोंगरदऱ्यांचे पावित्र्य

                             गेल्या काही वर्षांत आपल्या भारतात वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन प्रचंड प्रमाणात वाढले आहे आणि यापुढे दर वर्षी ते वाढतच जाणार यात तिळमात्र शंका नाही. त्या त्या ठिकाणच्या लोकांच्या रोजगाराच्या दृष्टीने व  सदर राज्याच्या आर्थिक बळकटीच्या दृष्टीने नक्कीच चांगली गोष्ट आहे . त्याशिवाय जास्तीत जास्त लोकं यानिमित्ताने आपल्या देशातले विविध भूप्रदेश ,लोकसंस्कृती , खाद्यसंस्कृती , लोककला अनुभवतायत  व वातावरण , भाषा , जैवविविधता यातले वेगळेपण अनुभवतायत याचाही आनंदच आहे .


                 गेल्या वर्ष  ४-५ वर्षांत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर फिरताना पर्यटनात झालेली लक्षणीय वाढ मी स्वतः अनुभवली आहे .साहसी पर्यटन सुद्धा याला अपवाद नाही . यापूर्वी देवस्थानं ,तीर्थक्षेत्र व थंड हवेची काही प्रसिद्ध  ठिकाणं सोडली तर इतर कित्येक ठिकाणी अत्यंत तुरळक मंडळी दिसायची .गड किल्ल्यांच्या बाबतीत  सांगायचं तर जिथे थेट वरपर्यंत गाड्या जाऊ शकतात वा रोप वे आहे असे काही बोटांवर मोजण्यासारखे सिहंगड ,प्रतापगड ,पन्हाळा ,रायगड सारखे किल्ले सोडले तर बाकी ठिकाणी जास्त करून ,गिरीप्रेमी -दुर्गप्रेमी मंडळी व ट्रेकर लोकंच दिसायची .आता मात्र गेल्या २ वर्षांत जवळजवळ सगळ्याच गड किल्ल्यांवर गर्दी वाढलेली दिसली .राजमाची ,कलावंतीण -प्रबळगड ,पेठ चा किल्ला ,विसापूर अश्या हमरस्त्यापासून जवळच असणाऱ्या किल्ल्यांवर गेल्या २ वर्षांत वीकेंड्सला अक्षरशः जत्रा भरलेली  दिसली . कात्रज ते सिहंगड , राजगड ते तोरणा असे मोठे ट्रेक्स गेल्या १० वर्षांत मी कैक वेळा केले आहेत . पण २०१६ -१७ मध्ये जितकी गर्दी मला या दोन्ही ट्रेकला दिसली तेव्हढी लोकं गेल्या ९ वर्षांमध्ये मिळून सुद्धा नाही दिसली . अधारबन ,देवकुंड धबधबा , भीमाशंकरच्या जंगलातील वाटा अश्या जागा आत्तापर्यंत हाडाचे ट्रेकर्स व आमच्यासारखे काही उनाड भटके यांच्याव्यतिरिक्त विशेष कुणाला माहिती नव्हत्या व अश्या ठिकाणांवर सुद्धा बरेच ग्रुप्स आलेले दिसतात .पूर्वी अश्या आडवाटेच्या ठिकाणांवर तुमच्या व तुमच्या ग्रुपशिवाय कुणीही दिसत नव्हते. पिण्याचे पाणी ,अन्नपदार्थ वगैरे सगळं स्वतःला पाठीवर वागवावे लागायचं . आता यांपैकी बऱ्याच ठिकाणी पाणी बाटल्या , नाश्ता-जेवण वगैरे सहजासहजी मिळतं .

                काही ठिकाणी अचानक  वाढलेल्या पर्यटनाला आपले बॉलिवूडचे चित्रपट आणि सोशल मीडिया खूप मोठ्या प्रमाणावर जवाबदार आहे असं माझं निरीक्षण आहे . 'थ्री इडियट्स'मधे दाखवल्या गेल्यानंतर पँगॉंग लेक जबरदस्त लोकप्रिय झालं .आजच्या घडीला  तिथे एकावेळी हजारो लोकं राहू शकतील अशी व्यवस्था केली गेली आहे . सिनेमात दाखवलेली तो पिवळी स्कुटरपण तिथे पर्यटकांसाठी आणून ठेवलीय म्हणे . ' ये जवानी है दिवानी' मधे दाखवल्या हिमालयीन ट्रेक नंतर हिमालयात ट्रेकसाठी जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले .  मनालीजवळच्या बंजारा कॅम्प , गुलाबा, रोहतांग पास, हमटा पास याठिकाणी झुंबड उडू लागली . " चेन्नई एक्सप्रेस' मधे दाखवलेला दूधसागर धबधबा बघून अनेकांनी पावसाळ्यात तिकडे गर्दी करणे पसंत केले . तर व्हाट्सअँप वरून फिरणारे कलावंतीण , सांदण दरी , देवकुंड धबधबा यांच्या व्हिडीओ क्लिप्स बघून तरुणाईची पावलं अश्या दुर्गम ठिकाणी पडू लागली .

               देशातली तरुणाई सह्याद्रीच्या - हिमालयाच्या कानाकोपऱ्यात जातेय , तिथली नवनवीन ठिकाणं शोधून काढतेय , तिथलं रौद्र रूप जवळून अनुभवतेय, कधी कडक ऊन  कधी बोचरा थंड वारा तर कधी आडवातिडवा कोसळणारा पाऊस दिवसभर तंगडतोड करत वा बाईक-सायकल चालवत अंगावर घ्यायला  शिकतेय , तिथलं अप्रतिम सौंदर्य आपल्या मोबाईलमध्ये-कॅमेऱ्यांमध्ये एका वेगळ्या स्तरावर जाऊन साठवतेय हे सगळं एका दृष्टीने नक्कीच सुखावह आहे .

               आज हे सगळं लिहिण्याचा हेतू 'पर्यटन वाढले' हे सांगण्याचा नसून ' पर्यटनाबरोबर बेशिस्तपणा - घाण -कचरा करण्याचे प्रमाण व इतर सर्वप्रकारचाच आचरटपणा कमालीचा वाढलेला आहे ' हा आहे .

 सह्याद्रीच्या डोंगरांवर साठत जाणारा कचरा      
             
गेल्या ४-५ वर्षांत सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात प्लास्टिक व कागदाचा हा कचरा अवाढव्य प्रमाणात वाढलेला दिसतोय . जे फक्त मौज मजा करायला सह्याद्रीत वा हिमालयात जातात त्यांना तो दिसणारसुद्धा नाही पण पर्यावरणाची , गड किल्ल्यांची विशेष काळजी घेणाऱ्या गिरीप्रेमी लोकांना व गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्ग स्वच्छतेसाठी राबणाऱ्या दुर्गप्रेमींचे साफसफाई मोहिमांचे त्यांनी गोळा केलेला कचऱ्याचे फोटो बघितले तर कदाचित माझं म्हणणं पटेल .

Let's recognize our heroes चे शिलेदार विक्रांत सिंग आणि सहकारी देवकुंड धबदब्याच्या मार्गावरून कचरा गोळा करून आणताना .

बा रायगड परिवाराचे अमर सोपनर आणि सहकारी किल्ल्यावरच्या दारूच्या बाटल्या आणि इतर कचरा गोळा करताना साभार : अमर सोपनर यांची फेसबुक वॉल

          तीच कहाणी हिमालयाची .गेल्या ऑगस्ट महिन्यात हिमालयात सायकलिंगला जाऊन आलो. तिथे हिमालयाच्या दुर्गम भागात पण भरपूर पर्यटन वाढल्याचे दिसले . मनाली- लेह- खारदूंगला या १० दिवसांच्या सायकल मोहिमेत असताना  देश विदेशातून आलेले असंख्य बायकर्स दिसले. बुलेटवाल्या लोकांचा तर अक्षरशः सुळसुळाट होता . त्यांच्याशिवाय वेगवेगळ्या आकारांच्या चारचाकींमधून आलेलं पब्लिक पण भरपूर होतं . जून ते सप्टेंबर हा हिमालयात फिरण्यासाठी उत्तम काळ . गर्दी ही असणारच . तरीसुद्धा वाटेवरचे स्थानिक दुकानदार , गाववाली लोकं यांच्याकडे चौकशी केल्यानंतर गेल्या  ४-५ वर्षांमध्ये पर्यटन खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे समजले .

         पर्यटन वाढले ही आनंदाचीच गोष्ट . परंतु येणारं बहुसंख्य पब्लिक हे सुशिक्षित असलं तरीही  सुसंस्कृत अजिबात नाहीये याची खात्री मनाली -लेह महामार्गावर हजारोंनी पडलेल्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या , वेफर्स- बिस्किटांची  वेष्टनं , रेडबुल , फ्रुटी , ट्रॉपिकाना पिऊन रस्तावरच टाकलेले कॅन्स , बियरचा फोडलेल्या बाटल्या इत्यादी कचरा बघून पटली .वाटेत लागणाऱ्या निळ्याशार सुंदर हिमालयीन तळ्यामध्ये पण काही मूर्खांनी टाकलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या बघितल्या . सायकलवर हिमालयातले घाट चढताना अक्षरशः इंच न इंच रस्ता तुमच्या डोळ्याखालून जात असतो .त्यावेळी पावलोपावली पडलेला असा कचरा बघून ही असली भिकारड्या मानसिकतेची लोकं डोक्यात जायला लागतात. दररोज शक्य तीथे सायकल थांबवून असे पडलेले कॅन्स ,बाटल्या उचलून माझ्या बॅगमधे घेण्याचे व कँम्पिंगला थांबू त्यावेळी आमच्या गाडीत ठेवण्याचे काम व त्यावेळी तो कचरा करणाऱ्याला मनापासून शिव्या घालण्याचे काम सुद्धा सुरूच होते ......

                                              पाँग च्या घाटात पडलेले रेडबुल चे कॅन 

   हिमनक ही बॉर्डर रोड अर्गनायझेशन ची हिमालयात रस्ते बनवणारी एक विलक्षण टीम . त्यांनी लिहिलेल्या या लक्ष वेधून घेणाऱ्या बोर्डावरच काही सडक्या मेंदूच्या हरामखोरांनी बिअरची बाटली फोडलेली दिसली . 


             आपण राहतो त्या ठिकाणांवर म्हणजे आपल्या शहरांमध्ये , गावांमध्ये आधीच आपण भयंकर कचरा करून ठेवलेलेच आहे . आता सह्याद्रीच्या , हिमालयाच्या पर्वतरांगा आपण घाण करायला लागलो आहोत .हे सगळं वेळीच थांबले नाही तर आणखी १०-१५ वर्षातच परिस्थिती भयावह  झालेली असणार यात शंका नाही .
 
                      स्वच्छता राखण्यासाठी मुद्दाम केले गेलेले संस्कार आणि लहानपणापासून लावलेली शिस्त हे दोन घटक तर महत्त्वाचे आहेतच पण याव्यतिरिक्त ज्याप्रकारे चित्रपट व सोशल मीडिया ही माध्यमं पर्यटन वाढण्यास कारणीभूत ठरली त्याचप्रमाणे त्याच माध्यमांचा उपयोग जनजागृतीसाठी प्रभावीपणे केला जाऊ शकतो .  नुकताच दुर्गसंवर्धन या विषयावर असलेला " बघतोस काय मुजरा कर" या नावाचा  एक मराठी चित्रपट येऊन गेला . भारतीय लोकांवर चित्रपटांचा प्रचंड प्रभाव असतो हे जगजाहीर आहे . एखाद-दुसऱ्या हिंदी चित्रपटात  आमिर / रणबीर अथवा गेलाबाजार सलमान खान लोकांना पर्यटनाला डोंगर दऱ्यांमध्ये गेल्यावर कचरा करू नका वगैरे डोस देताना दिसला अथवा रणवीर - दीपिका एखाद्या बुलेटवरून हिमालयात फिरताना लोकांनी टाकलेला कचरा आपल्या बॅगमधे उचलून टाकताना व त्यासोबत काही खरमरीत डायलॉग बोलताना दिसले तर आपल्या कॉपीकॅट सुशिक्षित अडाणी प्रेक्षकांवर थोडाफार प्रभाव नक्कीच पडू शकतो . ज्या वेगाने आपण सांदण दरीचे - देवकुंड धबधब्याचे , कलावंतिणीचा सुळक्याचे ड्रोन कॅमेऱ्यातून घेतलेले HD व्हिडीओ व्हाट्सअँपवर , फेसबुकवर शेअर करतो त्याप्रमाणेच थोडे प्रबोधनात्मक , गड किल्ले साफ करतानाचे , हिमालयातील सुंदर नितळ तलावांमधून प्लास्टिक बाहेर काढतानाचे HD व्हिडीओ पण शेअर करायला सुरु करू . कुठेही ट्रेक ला जाताना एखादी मोठी पिशवी अथवा पोते आपल्या ग्रुपचा कचरा टाकायला व त्याठिकाणी पडलेला कचरा उचलून आणायला सोबत घेऊ शकतो .



           आज ११ डिसेंबर , जागतिक पर्वत दिनाच्या निमित्ताने खालील ३ गोष्टी करण्याचा निश्चय करूया .

१. निसर्गात असताना स्वतःकडून कुठल्याही प्रकारचा अनैसर्गिक कचरा होणार नाही  याची दक्षता घ्यायची.
२. इतरांना कचरा करण्यापासून रोखायचे 
३. इतरांनी केलेला कचरा शक्य तेव्हा शक्य होईल तसा गोळा करून योग्य जागी त्याची विल्हेवाट लावायची . त्यासाठी कुठलीही लाज बाळगायची नाही .

--- ©अद्वैत पराग खटावकर

Wednesday, 6 December 2017

द डेक्कन क्लीफहँगर



                                    द डेक्कन क्लीफहँगर

गेल्या ४ आणि ५ नोव्हेंबर २०१७ रोजी द डेक्कन क्लीफहँगर ही ६४३ किलोमीटरची वार्षिक अल्ट्रा सायकल रेस जल्लोषात पार पडली .बऱ्याच दिवसापासून डेक्कन क्लीफहँगर या स्पर्धेबद्दल विस्ताराने लिहायचे होते . स्पर्धेबद्दलच्या पोस्ट्स टाकल्यानंतर बरीच लोकं इनबॉक्समध्ये येऊन " भाऊ DC म्हणजे काय ? " असं विचारात होती . त्यापैकी काही लोक नियमितपणे सायकलिंग सुद्धा करतात . यंदा स्पर्धेचे पाचवे वर्ष होते . वर्षागणिक स्पर्धेतील सहभाग प्रचंड वाढत असला तरीही जास्तीत जास्त लोकांना स्पर्धेबद्दल माहिती व्हावी , त्यातील स्पर्धकांच्या वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीबद्दल आणि नवनवीन विक्रमांबद्दल माहिती व्हावी यासाठी हा प्रपंच .


डेक्कन क्लीफहँगर काय असतं हे जाणून घेण्या अगोदर आपण Inspire India आणि RAAM बद्दल थोडीशी माहिती घेऊ .

भारतीय सायकलपटूंना जागतिक स्तरावरच्या सायकल स्पर्धांमध्ये जाण्याची संधी मिळावी , सहभाग वाढावा , व त्यांना जागतिक स्तरावरील नावाजलेल्या सायकलिस्ट लोकांमध्ये राहून शिकण्याची , स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळावी याकरिता Inspire India संघटना काम करते . जागतिक स्तरावरच्या सायकल स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आधी Qualifier स्पर्धांमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागत , अश्या Qualifier Races भारतामध्ये आयोजित करण्याचे काम व त्याकरिता आवश्यक ते सगळे काही Inspire India करते . Divya Tateमॅडम या Inspire इंडिया च्या सर्वेसर्वा व उत्तम सायकलिस्ट असून त्यांनी आत्तापर्यंत कैक सायकलपटूंना मार्गदर्शन केले आहे . त्यांच्याबद्दल लिहायचे झाल्यास एक वेगळा लेख लिहावा लागेल . तूर्तास google करून माहिती घ्यावी . हे झालं Inspire इंडिया बद्दल थोडक्यात . 

आता ज्यासाठी हा सगळं अट्टाहास त्या RAAM म्हणजेच Race Across America या जगातील सर्वांत खडतर सायकल स्पर्धांपैकी एक असलेल्या स्पर्धेबद्दल थोडक्यात माहिती घेऊ .

अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून सुरु होऊन पूर्वेकडील किनाऱ्यावर संपणारी , १२ राज्यातून जाताना तब्बल ३००० मैल म्हणजेच ४८२८ किलोमीटर अंतर व सुमारे १७०००० फूट म्हणजेच सुमारे ५१८०० मीटर चा एकूण चढ चढत उतरत जाणारी , वाटेत लागणाऱ्या अतिउष्ण व अतिशीत प्रदेशातून ऊन वारा पाऊस अंगावर घेत पूर्ण करायची रेस म्हणजे RAAM . वाचायला जेव्हढं भयंकर वाटतं त्याहून कितीतरी पट जास्त खडतर असणारी ही स्पर्धा solo वाल्यांना १२ दिवसाच्या आत तर टीम कॅटेगरी वाल्यांना ९ दिवसांच्या आत आपले खाणे-पिणे -झोपणे व इतर विधी रस्त्यांवरअथवा रस्त्यालगतच्या हॉटेल्स -कंट्रोल पॉईंट्स वर उरकत पूर्ण करायची असते . सोबतीला सपोर्ट कार व सपोर्ट टीम असते . ५१८०० m चा चढ म्हणजे एव्हरेस्ट सुमारे सहा वेळा चढण्याइतके होते . यावरून तुम्हाला स्पर्धेचा अदाज येईल .
तर अश्या या महाभयंकर स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल तर आधी स्वतःला एखाद्या भयंकर स्पर्धेत सिद्ध करून दाखवावे लागते . आणि ती भयंकर स्पर्धा म्हणजेच DC - द डेक्कन क्लीफहँगर . RAAM च्या आयोजकांनी नेमून दिलेल्या नियमांप्रमाणे या qualifier स्पर्धा होणे आवश्यक असते . RAAM qualifying साठी ४०० मैल म्हणजे सुमारे ६४३ किलोमीटर चे अंतर solo साठी ३२ तासांत पूर्ण करणे आवश्यक आहे . महिला स्पर्धकांसाठी आणि वेगवेगळ्या वयोगटांनासाठी हे वेळेचे बंधन वेगवेगळे आहे . तुम्हाला RAAM मध्ये कुठल्याही प्रकारात ( SOLO अथवा टीम ) भाग घ्यायचा असेल तरी RAAM qualifier ही solo गटातच पूर्ण करावी लागते .
नावाप्रमाणेच दक्खनच्या पठारावरून आणि डोंगरांच्या कड्यांवरून वळणं घेत ही स्पर्धा सह्याद्रीच्या रौद्र रूपाचे दर्शन घडवत शेवटी अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर संपते . यंदा पुणे -पाचगणी - भिलार -सातारा -कोल्हापूर-धारवाड - गोवा ( बागमालो बीच ) असा स्पर्धेचा मार्ग होता . वाटेत ६ कंट्रोल पॉईंट्स होते जिथे एका ठराविक वेळेपूर्वी पोहचून रिपोर्ट करायचा असतो .
                                               डेक्कन क्लीफहँगर स्पर्धेचा २०१७ चा मार्ग  
फॉरेस्ट ट्रेल, भूगाव मधल्या द क्लीफ पासून सुरु झालेले स्पर्धक आधी कात्रज चा चढ चढून शिरवळपर्यंत मजेत येतात . खंबाटकी घाट घामाघूम होत चढत नंतर सूर्य ऐन डोक्यावर असताना पसरणी घाटात जोर काढताना दिसतात .
                         कात्रज घाट चढताना सपोर्ट कार्सची झालेली गर्दी . साभार - रेणुका कुलकर्णी 
पाचगणीला पोचल्यावर जरा दम खायला उसंत मिळते ना मिळते तेव्हढ्यात भिलारच्या आसपास चे तीव्र चढ उरलासुरला जीव काढतात .
                          भिलार नंतरचा एक तीव्र चढ चढताना मी - साभार : Inspire India Official  Photographer
 पण त्यानंतर वाटेत लागणारे स्ट्रॉबेरीचे मळे , डोंगर उतार व डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग बघून थकलेल्या जीवाला जरा आराम मिळतो .मेढा येईपर्यंत थकवणारा चढ व जीवघेणी वळणं संपली असतात त्यामुळे जरा हायसे वाटायला लागते . पण त्यानंतर साताऱ्यापर्यंतचा व त्यापुढचा रस्ता कडक उन्हात उलटे वारे सुरु असताना मारायचा असल्याने त्यांना हायसे वाटून चालणार नसते . त्यातच त्यांच्या गटातील स्पर्धक पुढे जाताना दिसल्यावर तर परत अंगात संचारले जाते व पायडल जोरात मारली जातात ... घशाला सतत कोरड पडत असते , या आधी २-३ वेळा खाऊन सुद्धा पोटात कावळे ओरडायला लागलेले असतात . सपोर्ट टीम मधली लोकं अश्यावेळी स्पर्धकांना खायला प्यायला घालून त्यांचा पुढचा टप्पा सुकर करत असतात .
             गेली तीन वर्ष सातत्याने आपल्या गटात अव्वल नंबर मिळवणारा अरहाम शेख व त्यांच्या टीमची सपोर्ट कार  

कोल्हापूर च्या आसपास येईपर्यंत सूर्य अस्ताला गेलेला असतो पण स्पर्धक आणि सहाय्यक यांचा उत्साह मात्र तसाच असतो . हवेतील गारवा वाढत असतो , दिवसभर वेगवेगळ्या प्रकारे सायकल मारून कंबर तुटायला आलेली असते , पायात गोळे यायला सुरुवात झालेली असते . सायकलचे व सपोर्ट कार्स चे मागचे लाईट्स सतत लुकलुकत असतात .......स्पर्धकांचे पायसुद्धा सतत पायडलवर फिरताना दिसतात व त्यांच्याबरोबर पायडल चे चमकणारे रेडियमही सतत वर खाली चमकताना दिसत असतं .
  रात्रीच्या वेळी सपोर्ट कारच्या प्रकाशझोतात मार्गस्थ होताना एक स्पर्धक . साभार : Inspire India Official  Photographer

जरी वेग मंदावला असला तरी हेच सातत्य आणखी काही तास सुरु ठेऊन आपल्याला स्पर्धा वेळेत पूर्ण करायची आहे ...थांबून चालणार नाही . असंच काहीसं प्रत्येकाच्या डोक्यात सुरु असतं . . तवंडीचा छोटासाच पण दमवणारा घाट चढून सगळे धारवाडकडे मार्गस्थ होतात . शेवटी कर्नाटक -गोवा सीमेवरील महावीर पक्षी अभयारण्यातील थंडगार हवा ,घनदाट जंगल व त्यातून वळसे घेत जाणारा अप्रतिम रस्ता थकलेल्या स्पर्धकांसाठी एक अल्हाददायय अनुभव असतो .असंख्य वेडीवाकडी वळणं असलेला अल्मोद घाट काळजीपूर्वक उतरून स्पर्धक गोव्याच्या लाल मातीत उतरतात . पुढचा चढ उताराचा रस्ता व हमखास कुणीही मार्ग चुकू शकेल असे २-३ महत्वाचे फाटे पार कारून सरतेशेवटी स्पर्धक बागमालो बीच वर येऊन पोचतात .फिनिश लाईन वर वेळ नोंदवून आयोजकांकडून फिनिशर्स मेडल मिळाल्यानंतर समोर पसरलेला अथांग समुद्र खारं वारं अंगावर घेत बघताना मिळणार आनंद अवर्णनीय असतो ......
          स्पर्धेचा शेवट जिथे होतो तो बागमालोचा समुद्रकिनारा . साभार - प्रितेश कुलकर्णी 

गेले कित्येक महिने रात्रंदिवस केलेल्या मेहेनतीने चीज झालेले असते .काही जणांनी नवीन विक्रम केलेले असतात .काही मोजके धुरंदर ३२ तासांच्या आत स्पर्धा पूर्ण करून RAAM साठी qualify झालेले असतात .भारतीय सायकल जगताला नवीन हिरो हिरोइन्स- नवीन रोल मॉडेल्स मिळालेले असतात .तर काही जण त्यांच्या आयुष्यातील सर्वांत अभिमानाचे क्षण साजरे करत असतात .
संध्याकाळी बीचवर होणाऱ्या बक्षीस समारंभात व Cliffhangover party मध्ये उत्साह ओसंडून वाहत असतो . विजेत्यांना स्टेजवर बोलावून त्यांचे कौतुक होत असताना होणारा जल्लोष काही औरच असतो .

यावर्षीच्या DC मधले किस्से , काही लै भारी स्पर्धकांबद्दल माहिती , RAAM मधल्या भारतीयांच्या सहभागाबद्दल व त्यांनी केलेल्या विक्रमांबद्दल व इतर गमतीजमती परत कधीतरी .

- अद्वैत खटावकर .

सायकलवर पुणे ते मढेघाट : अविस्मरणीय राईड

 सायकलवर पुणे ते मढेघाट : अविस्मरणीय राईड -                   पूर्वी फारसा कुणाला माहिती नसणारा व दुर्गम डोगरात मुख्य गावांपासून काहीसा...