Sunday, 1 July 2018

सायकलवर पुणे ते मढेघाट : अविस्मरणीय राईड

 सायकलवर पुणे ते मढेघाट : अविस्मरणीय राईड -

                  पूर्वी फारसा कुणाला माहिती नसणारा व दुर्गम डोगरात मुख्य गावांपासून काहीसा एका कोपऱ्यात असणारा हा धबधबा आता मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीपासून सप्टेंबर पर्यंत पर्यटकांनी गजबजलेला असतो . वेल्हे तालुक्यात नैऋत्य दिशेला डोंगरांतल्या एका टोकाला केळद नावाचे एक छोटेसे खेडे आहे ; तिथून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा घाटावरून सरळ खाली कोकणात कोसळतो . येणाऱ्या पब्लिकपैकी कित्येकजण हे अमराठी असतात त्यांना याच्या नावाबद्दल कुतूहल असण्याचे तसे काही कारणच नाही मात्र कित्येक मराठी लोकांनासुद्धा याला मढे घाट का म्हणतात हेसुद्धा ठाऊक नसते . 



              पुरंदरच्या तहात मुघलांकडे गेलेल्या , व पुण्यापासून नजरेच्या टप्प्यात असणाऱ्या कोंढाण्यावरचे मुघलांचे हिरवे निशाण महाराजांच्या डोळ्यात खुपत होते . हातात असलेल्या स्वराज्याच्या भूभागात मधोमध असलेल्या कोंढाण्याचे स्थान सामरिकदृष्ट्या महत्वाचे होते . स्वतःच्या मुलाच्या लग्नाआधी कोंढाणा स्वराज्यात परत घेऊ असा महाराजांना शब्द देऊन १६७० च्या मार्च महिन्यात सुभेदार तानाजी मालुसरे निवडक मावळ्यांबरोबर सिंहगडावर चालून गेले . गडावर झालेल्या तुंबळ लढाईत कामगिरी फत्ते करताना सिंहाचा वाटा उचलणारे मराठ्यांचे सुभेदार धारातीर्थी पडले व कोंढाणा किल्ला नरवीर तानाजींच्या स्मरणार्थ सिहंगड म्हणून ओळखला जाऊ लागला . 
             देव देश अन धर्मासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या व स्वराज्याच्या शुभकार्यासमोर आपले कौटुंबिक शुभकार्य गौण समजणाऱ्या आपल्या सुभेदाराची अंतिमयात्रा त्यांच्या कोकणातील उमरेठ गावात सन्मानाने निघावी यासाठी तानाजींचा देह सिहंगड ते उमरेठ लवकरात लवकर पोहचावा म्हणून महाराजांनी विशेष व्यवस्था केली होती . गुंजण मावळातील गुंजवणी, भट्टी, वरोती मार्गानं त्यांचा देह उमरेठला नेण्यात आला. दुर्गम सह्यगिरीतून जाणारा हा मार्ग तसा दुष्करच. म्हणायला फक्त घाट पण प्रत्यक्षात घाटावरून खाली कोकणात उतरायला एकावेळी एकच माणूस जाऊ शकेल अशी छोटीशी वाट . धबधब्याच्या जवळून झाडीतून उतरणाऱ्या ज्या अरुंद वाटेने तानाजींचा मृतदेह नेण्यात आला त्या घाटवजा पाऊलवाटेलाच पुढं मढेघाट असं नाव पडलं.

          काही वर्षांपूर्वी बाईकवर 2 वेळा जाऊन आलो असल्याने तिकडच्या अत्यंत तीव्र चढ- उतारांची कल्पना होती .पुण्यातून सायकलवर निघावं - आधी सिहगडाच्या पायथ्याला जाऊन या वाटेनं निघावं , त्यानंतर डोंगराळ भागात घुसून  मढेघाट उतरून मग उमरेठ गाठावं आणि या प्रवासात सुभेदार तानाजींच्या  पराक्रमाची उजळणी करावी असं बरीच वर्ष डोक्यात होतं पण योग जुळत नव्हता. 
        अखेरीस काल म्हणजे ३० जून २०१८ रोजी तो योग जुळून आला . रात्री ठरविल्याप्रमाणे  शनिवारी सकाळी सनी आणि मी निघायचे ठरवले होते .सकाळी उठून त्याला फोन लावतोय तर उचलताच नव्हता . साहेब 🐎🐎 विकून झोपले असल्यामुळे फोन उचलत नसतील असे समजून शेवटी सन्याची वाट बघून पावणे सातच्या आसपास घरून एकटाच निघालो . हमखास वाटेत भेटणारे आमच्या धर हॅण्डल मार पायडल संघटनेचे   सक्रिय कार्यकर्ते निलेश भाऊ धायरीच्या आसपास भेटले . सुट्टीच्या दिवशी ऑफीसला कामं निपटवण्यासाठी निघाले  होते 😛 त्यांचं गाव पाबे घाटाच्या आसपास असल्याने त्या भागातल्या दोन चार महत्वाच्या गोष्टी सांगून त्यांनी निरोप घेतला .
             सातारा हायवेला सायकलने नेहमीच चकरा होतात म्हणून नसरापूर वरून न जाण्याचे ठरवले होते . वेल्ह्याला जाण्यासाठी पाबे घाटापेक्षा पानशेत वरून जाताना कमी चढ लागतो असं निलेशनी सांगितलं होतं . मी सुद्धा  पानशेतवरून त्या रस्त्यानी पूर्वी कधी गेलो नसल्याने त्यानिमित्ताने नवीन काहीतरी बघायला मिळेल या हेतूने तिकडून जाण्याचे ठरवले .त्याप्रमाणे पानशेतचा रस्ता पकडून जात असताना आधी सिहंगड पायथ्याला काही क्षण थांबून गडाचे रौद्र रूप डोळ्यांत साठवून घेतले व गडावर असलेल्या सुभेदारांच्या स्मृतिस्थळावर असलेला त्यांचा अर्धाकृती पुतळा डोळ्यांसमोर आणून मनोमन प्रणाम केला .  जरा पुढे गेल्यावर  खानापूर नंतर पाबे घाटाला जायचा रस्ता दिसला व अंगातला elevation चा किडा वळववळला . बऱ्याच वर्षांत पाबे घाटात सायकल चढवली नसल्याने पानशेतवरून जायचा बेत ऐनवेळी फाट्यावर मारून पाबे घाटातूनच जाण्याचे ठरवले व फाट्यावरून डावीकडचा रास्ता पकडला .
                 पाबे घाट म्हणजे पुण्यातल्या तमाम सायकलिस्ट लोकांसाठी पर्वणी . अत्यंत तीव्र चढ उतार असणारा व अनेक नागमोडी वळणं असणाऱ्या या घाटात डबलसीट चढताना १०० - १२५ cc च्या मोटारबाईक्स सुद्धा फाफलतात . सायकलवरून पुण्यातून निघून वाटेतले चढउतार पार करत पाबे घाट एका दमात मारणं म्हणचे  एकप्रकारची परीक्षाच असते . माझी परीक्षा आता सुरु झालेली ... पण ती चढामुळे नव्हे तर बरेच दिवस सर्व्हिसिंग न केलेली सायकल घेऊन आल्यामुळे . सायकलचा पहिला गिअरच काही केल्या पडत नव्हता . एरवी पुण्याच्या आसपास कधी पहिला गिअर टाकायची गरजच पडत नसल्यामुळे इतक्यात तो वापरलाच गेला नव्हता . त्यामुळे नाईलाजाने २-१ वर उभे राहून जोर देऊन सायकल चढवाववी लागली . वाटेत एकाठिकाणी फार सुंदर वळण लागतं तिथे फोटो काढण्यासाठी थांबलो . 



          फोटोत फक्त घाटदार वळण दिसत असले तरी प्रत्यक्षात तिथे भयंकर चढण आहे ज्याची मजा घ्यायची असेल तर सायकल घेऊन स्वतः अनुभव घेणेच उत्तम . आसपास विशेष वर्दळ नसणारा पाबे घाटाचा परिसर हिरवाईने नखशिखांत नटलेला दिसत होता . वरून दिसणारी शेतं हिरव्या रंगात किती वेगवेगळ्या छटा असू शकतात याची प्रचिती देत होती . खालून मोरांचे मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज येत होते .आजूबाजूला पाखरांचा किलबिलाट सुरु होता . घरापासून सुमारे ४० मिलीमीटर चढाच्या रस्त्याने घेऊन सुद्धा थकवा जाणवत नव्हता . घाटमाथ्यावर पोचेपर्यंत शरीर गरम झाले होते .  पुढच्या डोंगराळ रस्त्यासाठी वॉर्म अप झाला होता .  

            घाटमाथ्यावरून दिसणारा विस्तीर्ण परिसर काही क्षण न्याहाळून लगेच घाट उतरायला सुरुवात केली . पुढचा उतार उतरताना सायकलचा दुसरा व अत्यंत महत्वाचा  प्रॉब्लेम समजला .... डिस्कब्रेक्स खूपच कमी लागत होते , त्यामुळे दोन्ही ब्रेक्स करकचून दाबूनच शक्य तितक्या हळू घाट उतरलो . खरंतर माझाच मूर्खपणा होता . तुम्ही कितीही अनुभवी सायकलिस्ट  असलात तरीही दरवेळी काहीतरी नवीन गाढवपणा करत असता व त्यातून शिकत असता . गेल्या महिन्यातच मी माझी MTB upgrade केली . २६ इंच चाकं असलेली जुनी MTB विकून दुसरी २९ इंची चाकांची व डिस्क ब्रेक्स असलेली SCOTT ची ASPECT 950 घेतलेली .  डिस्क ब्रेक्स लूज आहेत हे माहिती असून पण सगळीकडे तशीच दामटत होतो . आतापर्यंत चालून गेलं तसं या राईड ला पण चालून जाईल , नंतर परत आल्यावर करू सर्व्हिसिंग असं काहीस डोक्यात घेऊन मी घरून निघालो होतो .आज पाबे घाटाच्या उताराने मात्र माझ्या सायकलच्या ब्रेक्सची व माझ्या ब्रेक्सबाबतच्या समजुतीची पार वाट लावलेली होती. 


           पुढे पाबे गावातून जाऊन वेल्ह्याच्या रस्त्याला लागलो  व सुमारे १०.:३० च्या आसपास वेल्ह्यात नाश्त्याला थांबलो . वेल्ह्यातील मटण थाळीसाठी  प्रसिद्ध असलेले हॉटेल स्वप्नील यांनी त्यांची खास बिर्याणीसाठी दुसरी शाखा गावातच उघडली आहे .घाट मारून भूक लागली असल्याने माझी बिर्याणी खायची तयारी होती मात्र इतक्या सकाळी बिर्याणी तयार नसल्याने मला अंडा भुर्जीवर ताव मारावा लागला . चवदार अंडा भुर्जी व वहिनींच्या (हॉटेल मॅनेजरच्या मिसेस) हातच्या गरम गरम घरच्यासारख्या चपात्या खाऊन तृप्त झालो . तितक्यात बाहेर लहान लहान पोर जमून गडबड करताना दिसली . हॉटेल च्या मॅनेजरच्या पाचवीतल्या मुलाची सायकल रात्री जवळच्या वाडीतल्या कुणीतरी चोरून नेलेली , ती गावातल्याच त्याच्या दोस्तांनी शोधून परत आणलेली . ती त्याला द्यायला म्हणून गॅंग जमली होती . एकीकडे आपल्या पराक्रमाचे  रसभरीत वर्णन करताना सोबतच त्याच्या सायकलची बाहेरच लावलेल्या माझ्या सायकलबरोबर तुलना सुरु होती . पोरांबरोबर फोटो काढून पुढच्या प्रवासाला निघालो . 


         थोडासा चढ चढून पुढे गेल्यावर गुंजवणे धरणाची भिंत व जलाशय लागतो . अजून त्या भागात जोरदार पाऊस झाला नसल्याने जलाशय पूर्णपणे भरलेला नव्हता तरीसुद्धा ढगाळ  वातावरणात जलाशयाच्या कडेकडेने जाताना प्रसन्न वाटत होतं . 
जरा पुढे गेल्यावर तोरणा किल्ल्याची मागची बाजू दिसली . पुणे जिल्ह्यातील सर्वेच्च ठिकाण असणारे तोरणा किल्ल्याचे टोक ढगात होते . एक फोटो घेऊन पुढे निघालो .  



          पुढच्या रस्त्यावर पुष्कळशी बांबूची झाडं लागतात व दाट झाडीसुद्धा सुरु होते . २-३ चढ चढल्यावर एक घाट लागतो . सरळसोट चढ चढल्यानंतर ३-४ वळणं घेत रास्ता एका डोंगरावर घेऊन जातो . सायकलवर हा घाट चढताना खरा कस लागतो . एखाद्याला चढाईचा पुरेसा अनुभव नसेल तर तो हा घाट चढणं केवळ अशक्यच .वर गेल्यानंतर डावीकडे परत एकदा तोरणा किल्ल्याचा बुधला माचीकडचा भाग दिसतो . 



        काही वर्षांपूर्वी इकडे जंगल आणि मोजकी खेडी पाडे सोडलं तर काही म्हणजे काहीही नव्हतं . आता मात्र २-३ रिसॉर्ट आणि ४-५ चहा भज्यांच्या टपऱ्या झालेल्या दिसल्या . या डोंगरावरून जाणारा रस्ता आणि वरून दिसणारे दृश्य दोन्हीही खूप सुंदर . रस्त्यावरून जाताना दोन्ही  बाजूंनी डोंगराच्या कडा दिसतात . अरुंद असलेल्या या डोंगराच्या आजूबाजूला जर ढग उतरले असले तर आपण ढगातून जात असल्याचा भास होतो . 

      नंतर तीव्र उतार सुरु होतो  जो खालच्या पाड्यात घेऊन जातो .. ह्या उतारावर दोन्ही ब्रेक्स संपले होते  . २ ठिकाणी उतारावर पाय घासत कसेबसे वळणावरून खाली पडता पडता वाचलो. आपल्या सायकल चे दोन्हो ब्रेक्स एकदम वारले असून या डोंगराळ भागात आपण अशीच सायकल दामटवली तर आपले पण दिवस भरतील हे लक्षात आलं .आता फार शहाणपणा न करता सरळ परतीची वाट पकडावी असे मनात आले . सायकल कॉम्पुटरमधे बघितल्यावर लक्षात आले की मढेघाट अजून फक्त ९ किलोमीटर आहे . आपण बऱ्याच वर्षांनी सायकल घेऊन इकडे इतक्या दूरवर आलोय ,आत्ताच माघार घेण्यापेक्षा ज्याकरता आलोय तिथे जाऊनच मग परत फिरू , मात्र यापुढे जाताना व परत जाताना प्रत्येक उतारावर सायकल हातात घेऊन चालत उतरावे लागेल असा विचार केला व पुढचा रस्ता पकडला .           
            थोडंसं पुढे गेल्यावर एक ओढा लागला . त्या ओढ्याच्या पुलावर २०१२ साली बाईकवर आलो होतो तेव्हा एका सरड्याच्या फोटो काढलेला . आत्ताही उगाचच नजर त्याठिकाणी कुणी सरडा वगैरे दिसतोय का हे शोधात होती . आपल्या खुळेपणावर  हसत ओढा पार करून पुढे निघालो.


२०१२ मधे काढलेला फोटो 
           पुढचा केळद घाट लागण्यापूर्वी भाताची  हिरवीगार शेतं लागली. त्यांचा हिरवागार रंग डोळ्यांमधून थेट मनापर्यंत जात होता . घाट सुरूहोण्यापूर्वी व शरीर परत एकदा गरम होण्यापूर्वी आतून थंडावा मिळाला . 





             केळद घाट सुद्धा आधीच्या दोन्ही घाटांइतकाच घाणेरडी चढण असलेला . ग्रेडियंट १२-१३ च्या पुढेच . घाट सुरु होताना पाऊस सुरु झाला . तापलेल्या रस्त्यावर पावसाचे थेंब पडताच वाफा निघायला लागल्या . त्या वाफांमधून वारं चढताना मजा वाटत होती . वर खिंडीत पोचल्यावर पुढे उतार लागला . मी गप सायकल हातात घेऊन उतरणं सुरु केलं . थोडं खाली उतरल्यानंतर खराब रस्ता लागतो . त्यावरून सरळ पुढे गेलं की केळद गाव लागतं . इथूनच मढेघाट धबधब्याला जायचा रस्ता लागतो . हल्ली गावकऱ्यांनी आलेल्या गेलेल्यांची नावे , वाहनांचा क्रमांक वगैरे नोंदवून घेणे सुरु केले आहे . त्याचप्रमाणे माणसी १० रुपये उपद्रव शुल्क पण आकारण्यास सुरुवात झाली आहे .  




      इथून धबधब्यापर्यंत कच्चा रस्ता आहे .माझ्याकडे MTB असल्याने मी थेट धबधब्यापर्यंत सायकलवर जाऊ शकलो . ओढ्याला पाणी कमी होतं आणि दाट ढग असल्यामुळे काहीही दिसत नव्हतं . धबधबा दिसेल का नाही याचा विचार करत मी पलीकडच्या कड्यावर गेलो . दुसरीकडून धबधब्याचा आवाज तर येत होता . जरावेळात ढग विरळ जाळे आणि पलीकडे कड्यावरून कोसळणारा पांढराशुभ्र धबधबा नजरेस पडला . १० मिनिटांत सगळे ढग दूर होऊन लक्ख सूर्यप्रकाश पडला आणि धबधबा स्पष्ट दिसायला लागला . खाली कोकणात उतरणारी वाट सुद्धा दिसायला लागली . खाली दूर असलेली गावं, शेतं, झाडी वगैरे सगळं स्पष्ठत दिसायला लागलं . दूरवर दिसणारे सह्याद्रीचे कडे , त्यांचे विविध रांगडे आकार , वर कापूस पिंजून ठेवल्यासारखे वेगवेगळ्या छटा असलेले ढग , आजूबाजूचे जंगल व साथीला धबधब्याचा धीरगंभीर आवाज . सगळं काही स्वर्गीय .



सह्याद्रीतला हा स्वर्गीय भूभाग खरंतर नशिबवानच म्हणायचा . तात्कालीन भारताचा मोठा प्रदेश मुघली अंमलाखाली असताना या प्रदेशाला शिवरायांच्या स्वराज्यातला प्रदेश होण्याचे भाग्य मिळाले . तसेच त्या स्वराज्यासाठी जीवाचे मोल देणाऱ्या वीरांचे अंतिम दर्शन घेण्याचे सुद्धा भाग्य मिळाले . 



त्या वातावरणात रमलो असताना " आपल्या सायकल चे ब्रेक्स संपले आहेत ...जाताना सगळे उतार पायी उतरायचे आहेत , परत जायला वेळ लागणार आहे . तेव्हा हे स्वर्गसुख घेत न बसता आता परत निघावे" असा विचार करून मी परतीच्या वाटेवर निघालो .परत येताना केळद घाटाची चढाई धाडून खिंडीत आल्यावर हा बोर्ड दिसला . 

       लगेच सायकलवरून खाली उतरलो व सायकल हातात घेऊन उतार उतरायला लागलो . इकडचे उतार खरोखरच भयंकर आहेत  याची जाणीव ब्रेक्स नसतानाच होते . 




          खाली उतरून जरा पुढे जातोय तोवर मगाशी उतरलेला घाट व त्याआधीचा उतार आता चढण्यासाठी सज्ज होता . जास्त विचार न करता खाली मान घालून चढायला सुरुवात केली . आधी वळणं चढून झाली , मग सरळ चढ चालून झाला  मग येताना लागलेला मँगो रिसॉर्ट लागला , परत एकदा चढ , त्यानंतर आता सरळ रस्ता लागेल असं वाटतंय तोवर परत एकदा चढ ...असं सुमारे ४० मिनिट चढून चढून दम निघाला तरीही सपाट रस्ता येण्याची चिंन्हे दिसेनात . त्यात ढग दाटून आल्यामुळे अंधारून आलेलं , पावसाला सुरुवात झालेली . आणखी ५ मिनिटं चढल्यानंतर जरा सपाट रस्ता लागला . भयंकर भूक लागलेली व प्रचंड थकवा पण जाणवत होता . जरा पुढे गेल्यावर एक टपरी लागली . तिथे खायला थांबलो . तोपर्यंत मुसळधार पाऊस सुरु झालेला . मी डोंगर माथ्यावर असल्याने वारं पण प्रचंड होतं . सोबत आणलेला रेनकोट अंगावर चढवून गरम गरम आम्लेट पाव आणि चहा घेतला . जरावेळ विश्रांती घेऊन पाऊस कमी होण्याची वाट बघत बसलो . ५० मिनिटं टाईमपास करून सुद्धा पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता . आणखी एक चहा घेतल्यामुळे तरतरी जाणवत होती . साडेचार वाजून गेले होते . अंधार पडायच्या आत किमान नसरापूर तरी गाठावं म्हणून पावसातच निघालो . थोडं पुढे गेल्यानंतर मोठा घाट उतार लागला जो शिस्तीत हात सायकल घेऊन मी चालत पार केला .           

त्यानंतर सायकलवर टांग मारून सरळ वेल्हे गाठलं . वाटेतले उतार सरळ रस्ता असल्यामुळे व्यवस्थित पार पडले ..खाली उतरायची गरज पडली नाही . आम्ही सायकलिस्ट जमातीमधले लोक केवळ उतारावरून व वळणांवरून सुसाट गिरक्या घेत खाली येत यावं म्हणून मोठेमोठे घाट जीवाला त्रास करून घेत चढतो . आज मात्र नेमकी उलटी परिस्थिती होती . आज चढ आल्यावर बरं वाटत होतं  तर उतार आल्यावर भीती . 😰 💀आता आणखी उतार नकोत म्हणून परत पाबे घाटात न जाता नसरापूर मार्गे जाण्याचे ठरवले . वेल्हे - ते नसरापूर हे ३१ किलोमीटरचे अंतर अंधार पडायच्या आत पार करायचे म्हणून सुसाट सायकल ठोकली . आता दम काढणारे चढही नव्हते व भीतीदायक उतार सुद्धा नव्हते . २५ kmph चा ऍव्हरेज स्पीड पकडून ७:१५ च्या सुमारास मी नसरापूर पार करून संपूर्ण काळोख व्हायच्या आत सातारा हायवेला लागलो होतो . परत एकदा चहा - भेळ खाऊन ताजेतवाने होऊन सायकल चे दिवे सुरु केले व खेड - शिवापूर , कात्रज नवीन बोगदा पार करत रात्री ९:३० च्या सुमारास घर गाठले . 

strava वर डेटा सिंक करून बघितल्यावर आपण आज तब्बल २७०६ मीटर ची चढाई करताना १६० किलोमीटर सायकल चालवल्याचे लक्षात आले . स्वराज्यनिमितीत योगदान असणाऱ्या एका वीराच्या आठवणीत व निसर्गाच्या सानिध्यात संपूर्ण दिवस गेला याचे समाधान वाटले . सायकल च्या ब्रेक्समुळे मात्र ही राईड कायम लक्षात राहील . 



--- ©Advait Khatavkar

Tuesday, 2 January 2018

डेन्मार्क व स्वीडन दरम्यानचा ओरसेंड पूल - अभियांत्रिकी व वास्तुस्थापत्य क्षेत्रातील एक कमाल

डेन्मार्क व स्वीडन दरम्यानचा ओरेसंड  पूल - अभियांत्रिकी व वास्तुस्थापत्य क्षेत्रातील एक कमाल

             २०१५ च्या जून महिन्यात कामानिमित्त्य स्वीडनला जाण्याचा योग आला .तिथला मुक्काम तीनच आठवडे असल्यामुळे सपत्निक जाण्याचे ठरविले.  स्वीडन म्हणजे जगातल्या संपन्न , समृद्ध आणि शांत देशांपैकी एक . उत्तर ध्रुवाजवळ असलेल्या या स्कॅंडेनेवियन देशात गेल्यावर डोळ्याचे पारणे फेडणारी अनेक ठिकाणं आपल्याला बघायला मिळणार याची खात्री होती.

             आधी मुंबई ते पॅरिस आणि नंतर पॅरिस ते कोपनहेगन असा विमान प्रवास करून आम्ही कोपनहेगन विमानतळावर  पोचल्यानंतर डेन्मार्क व स्वीडन यांच्यामधल्या ८ किलोमीटर  समुद्रावर पूल बांधून बनविलेल्या व सुमारे ४ किलोमीटर समुद्राखालून भुयार बनवून बांधलेल्या ओरेसंड मार्गावरून मेट्रो पकडून स्वीडनच्या माल्मो शहरात दाखल झालो . जगातल्या प्रमुख आंतरराष्ट्रीय पूलांपैकी असणाऱ्या - डेन्मार्क व स्वीडन दरम्यानच्या ओरेसंड सामुद्रधुनी वर असलेल्या या पूलाबद्ल आधीपासूनच बरेच कुतूहल होते .त्याबद्दल थोडक्यात माहिती  करून देण्याचा हा प्रयत्न .

                 
               या दोन देशांना पुलाद्यारे जोडण्याची योजना तशी फार जुनी म्हणजे १९३६ सालातली . त्याकाळच्या काही नामवंत बांधकाम कंपन्यांनी त्यावेळी सरकारकडे अशाप्रकारचा महाकाय समुद्री पूल बांधण्याची योजना मंडळी होती . पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ती योजना पारच बारगाळली गेली . पुढे अनेकदा या ना त्या कारणाने हा मुद्दा स्वीडन व डेन्मार्क या देशांच्या सरकारांमध्ये चर्चेत येत राहिला .. १९७३ साली या प्रश्नाने उचल देखील खाल्लेली परंतु सादर देशांपुढील आर्थिक परिस्थितीमुळे पुन्हा १९७८ साली हि योजना रद्द करावी लागली . कालांतराने हळूहळू गोष्टी सकारात्मक होत गेल्या व १९९५ साली सुरु झालेले हे महाकाय बांधकाम सुमारे पाच वर्षांनी पूर्ण होऊन १ जून २००० साली हा पूल व भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला .


डेन्मार्क व स्वीडन दरम्यानचे छोटेसे बेट व बेटापासून डेन्मार्क च्या मुख्य भूमीशी जोडल्या गेलेला पूल . या बेटापासून स्वीडनपर्यंतचा मार्ग समुद्राखालून बनवलेल्या भुयारातून जातो .

 २००० साली बांधून पूर्ण झालेला हा मार्ग अभियांत्रिकी व वास्तुस्थापत्य क्षेत्रातील एक कमाल म्हणता येईल . दोन देशांच्या मधोमध असणाऱ्या एका छोट्याश्या बेटाचा आधार घेऊन हा मार्ग बनविण्यात आला .डेन्मार्क मधील कोपनहेगन ते या बेटापर्यंत केबल वापरून बनवलेला पूल अगदी आपल्या वांद्रे-वरळी सी लिंक सारखाच दिसतो . या बेटापासून स्वीडनच्या माल्मो शहरापर्यंतचा मार्ग पूर्णतः भुयारी असून समुद्राच्या खाली असणाऱ्या भूभागातून तो जातो .अवाढव्य पूल व समुद्राखालचे भुयार या दोन्ही गोष्टी बनवताना अंदाजे २.६ बिलियन युरो म्हणजे सुमारे २० हजार करोड रुपये इतका खर्च आला . याशिवाय तो बनवायला लागलेली प्रचंड मेहनत , पुलाच्या मधले भाग बसवायला लागलेल्या तरंगत्या राक्षसी क्रेन्स , भुयार खोदण्यासाठी लागलेले अद्यावत तंत्र व मोठमोठया मशिन्स हे सगळंच अद्भुत होतं . बांधकाम होतं असतानाचे व्हिडीओ यू ट्यूबवर  उपलब्ध आहेत .


वरील सर्व छायाचित्रे साभार - इंटरनेट 


                 आजघडीला स्वीडन व डेन्मार्क या शेजारीज देशातील वाहतूक अत्यंत सोपी व जलद होऊ शकली ती या अचाट बांधकामामुळेच .यावरून एकाचवेळी खालून रेल्वे व वरून मोटार गाड्या जाऊ शकतील अश्या प्रकारची व्यवस्था असणाऱ्या या मार्गावरून हजारो लोकं दररोज ये जा करत असतात. अर्थात यासाठी वाहनचालकांना टोल सुद्धा मजबूत भरायला लागतो . पुलाची उंची मुद्दामून जास्त म्हणजे २०४ मीटर ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून मोठमोठी जहाजं पुलाच्या खालून सहज जाऊ शकतील .

पुलावरून कोपेनहेगनला जात असताना रेल्वेतून काढलेला फोटो  

 या पुलावरून दिवस उजेडी जाताना , खास करून रेल्वेतून जात असताना खूप भन्नाट वाटतं . खिडकीतून दोन्ही बाजूंना अथांग समुद्र दिसत असतो व आपण त्यावरून तरंगत जातोय असा भास होतो . पुलाच्या आजूबाजूंना असलेल्या पवनचक्क्या व दोन्ही बाजूंना लांबवर दिसणारे डेन्मार्क व स्वीडन देशांचे किनारे तुमची सफर आणखीनच प्रेक्षणीय बनवतात . कधी यूरोपात डेन्मार्कला व स्वीडनला जाण्याच्या योग आला तर माल्मो ते कोपनहेगन हा प्रवासाची मजा या पूलावरून आवर्जून घ्यावी .

--- ©Advait Khatavkar

सायकलवर पुणे ते मढेघाट : अविस्मरणीय राईड

 सायकलवर पुणे ते मढेघाट : अविस्मरणीय राईड -                   पूर्वी फारसा कुणाला माहिती नसणारा व दुर्गम डोगरात मुख्य गावांपासून काहीसा...